#४

शाळेतला बाक !!!!

परवा एकदा शाळेतला बाक भेटला , शरीराला बाक ,लटपटते पाय , थोडा थकलेलाच वाटला !

"ओळखलंस कां मला ", विचारलं त्यानं हसून , " वेळ असेल तुला , तर , बोलूया थोडं बसून "!

गाडी बघून सुखावला , हलविली तुटकी मान , " खुप मोठा झालास रे , पैसा कमवलंस छान !"

"ओळखल्यास कां बघ , माझ्या अंगावरच्या रेषा ?, वर्गात गाणी म्हणतांना , वाजवीत होतास ताशा !

अजुनही भेटतात कां रे, पक्या , बक्या , बंटी ? हातात हात घालून करतात कां रे ? धमाल , गप्पा अन् गोष्टी ?"

डब्बा खाता कां रे पुर्वी सारखा चोरून ? निसरड्या वाटा चालता कां रे , एकमेकांचा हात धरून ?"

टचकन डोळ्यात पाणी आलं , कंठ आला दाटून , मित्र सुटले ,भेटी ऊरल्या , सोबत गेली सरून !

धावता धावता सुखासाठी , जेव्हा मागे वळून पाहिलं , एकटाचं पुढे आलो मी , आयुष्य मागेच राहिलं !

त्राण गेले आवेष संपला , करावंतरी काय ? कोरड पडते घशाला आठवणींनी , करावे तरी काय ?

तेवढ्यात शेजारी जवळ आला , घेतलं त्यानं कुशीत , थोड्या वेळाचा विरंगुळा , मस्त होतो खुषीत !

अरे वेड्या पैशासाठी फिरतोस तू वणवण , कधीतरी आठवून बघ , सरलेलं तूझं बालपण !

मित्र सगळे जमव पुन्हा , जेव्हा येईल विट , वंगण लागते रे बाकाला , मगच होऊ शकतो मी धीट !

शाळेतल्या सोबत्याचा , खुपच आधार वाटला , परवा अचानक शाळेतला , जुना बाक भेटला !

— संदीप सु. श. परुळकर